लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल्च्या राष्ट्रीय हरित सेनेचा चिमुकला सुरज याने विविध वृक्षांच्या ४५० बिया जमा करुन एक आगळावेगळा छंद जोपासला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा झपाट्याने ºहास होत आहे . बदलेले ऋतुचक्र , तापमानात झालेला बदल , अवकाळी पाऊस , गारपीट ,अस्मानी सुल्तानी संकट हे जगावर घोंघावत असलेले नैसर्गिक संकट दूर करायचे असेल तर वृक्ष लागवड व त्याच बरोबर त्यांच्या संवर्धनावर भर द्यावा लागणार आहे . ही महत्वाची बाब इयत्ता पाचव्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकला सूरज विनोद वाझुळकर याने ओळखली .सुरजने पर्यावरण बचावाचा संदेश देण्याकरीता आगळा वेगळा छंद जोपासला .खेळण्या बागडण्याच्या वयात त्याने ४५० विविध वृक्षांच्या बिया गोळा करून वृक्षांची बेसुमार कत्तल करणाºयासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे . शाळेत राबविण्यात येत असलेल्या हरितसेनेच्या उपक्रमातुन प्रेरणा घेत सुरजने हा छंद प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरित सेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात जोपासला. विदर्भातील शहरी व ग्रामीण भाग आणी रानावनात पूर्वी विविध प्रकारचे वृक्ष असायचे, मात्र गेल्या काही दशकात या वृक्षांची अमाप कत्तल होउन सिमेंट तथा डांबरीकरणाचे रस्ते उदयास आले . मोठमोठी घरे उभारतांना वृक्षांचे मुळातुन अस्तित्व संपविण्यात आले . परिणामी हल्ली अनेक मानवी आरोग्यास हितकारक तथा औषधि उपयोगी वृक्ष-वेली ,झाडे नामशेष झाली आहे . हि महत्वाची बाब लक्षात घेउन एस.एम.सी.इंग्लिश स्कूलने महाराष्ट्र शासनाच्या हरित सेना उपक्रमात सहभाग नोंदविला आहे . शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी हा उपक्रम केवळ कागदोपत्री न राबविता प्रत्यक्ष कृतीवर अधिक भर दिला . यातून प्रेरणा घेत हरितसेनेत सहभागी विद्यार्थ्यांना देखील विविध प्रकारच्या वृक्षांशी लळा लागला आहे . त्यातीलच सुरज वाझुळकर या चिमुकल्याने ४५० प्रजातीच्या वृक्ष वनस्पतींच्या बियांचा संग्रह करुन जनसामान्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे .
बियांचे प्लास्टीक पिशाव्यांमध्ये वेगवेगळे संच
सुरजने महत्प्रयासाने गोळा केलेल्या या बियांचे बियांचे प्लास्टीक पिशाव्यांमध्ये वेगवेगळे संच बनविण्यात आले असुन त्यातील काहि संच वाशीमच्या सामाजिक वनीकरण विभागाला आगामी पावसाळ्यात लागवड करण्यासाठी दिले जाणार आहे व उरलेल्या बियांचा वापर एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या परिसरातील बॉटनिकल गार्डनसाठी वापरला जानार आहे .