लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शासनाच्या जलयुक्त शिवार,जलजागृती आदि योजनांसह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या कार्याला सहकार्य करून जलदूत आणि जलसेवकांना सर्व पाठबळ देण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाने १० जिल्हास्तर जलनायकांची निवड केली आहे. शासनाच्यावतीने राज्यात कायमस्वरुपी जलजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जलजागृतीसाठी विविध उपक्रम तयार करणे व ते जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जलसाक्षरता केंद्रात करण्यात आली असून, जलजागृती उपक्रम जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर अनुक्रमे जलनायक, जलकर्मी व जलसेवक अशा उत्स्फूर्त स्वयंसेवकांची संरचनात्मक शृंखला निर्माण करण्यात येत आहे. या अंतर्गत वाशिम पाटबंधारे विभागाच्यावतीने १० जिल्हास्तरीय जलनायकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सोनाली तायडे, प्रभू कांबळे, सुनिता कांबळे, भाष्कर गुडदे, राजेंद्र पडघान, श्याम भुसेवार, विठ्ठल लोखंडे, श्याम सवाई, अजय काटकर आणि प्रफुल बाणगावकर यांचा समावेश आहे. ही नियुक्ती पूर्णत: स्वंयसेवक या स्वरूपाची असून, यासाठी जलनायकांना कुठलेही मानधन देय नाही. तथापि, प्रशिक्षण, क्षमता बांधणी या प्रशिक्षणासाठी त्यांना जलसाक्षरता केंद्रामार्फत निमंत्रित करण्यात येणार आहे. जलसेवक आणि जलदुतांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ प्रशिक्षक (मास्टर ट्रेनर) म्हणून काम करणे, इतर प्रशिक्षण वर्गात योदान देणे, जिल्हा व तालूकांतर्गत समन्वय ठेवणे, राज्य शासनाच्या विविध विभागाकडील जलव्यवस्थापनाशी संबंधित योजना व कार्यक्रम एकात्मिक पद्धतीने लाभार्थीपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करणे आदि जबाबदाºया या जिल्हास्तर जलनायकांना पार पाडाव्या लागणार आहेत.
पाटबंधारे विभागाकडून जिल्हास्तर जलनायकांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 1:54 PM