कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, खासगी डॉक्टर्स, पोलीस, नगरपालिका यासह सर्व सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना नागरिकांचेही सहकार्य आवश्यक आहे. सरकारने नागरिकांच्या फायद्यासाठी कोरोनाविषयक नियम लागू केले आहेत. त्याचे पालन करून सर्वांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यास हातभार लावला तर निश्चितच आपण कोरोनावर मात करू. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळणे हा सद्य:स्थितीतील प्रभावी उपाय आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा विचार करून या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक वस्तू महत्त्वाच्या आहेत; पण त्यापेक्षाही जीवन आवश्यक आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कोरोना विषाणू संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसून येताच, तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना चाचणी व उपचार घ्यावे. कोरोना चाचणी करण्यास विलंब करू नये. तसेच लक्षणे दिसून येताच इतरांच्या संपर्कात येऊ नये. यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार अधिक प्रमाणात होऊ शकणार नाही. तसेच गृह विलगीकरणात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. चार ते पाच दिवसांनंतर आपल्याला कुठलाच त्रास होत नाही, असे जाणवल्यावरही घराबाहेर पडू नये. अन्यथा त्यातून मोठ्या प्रमाणावर संक्रमण पसरत असल्याची भीती आहे. अशी एक व्यक्ती किमान ५० ते ६० जणांना बाधित करू शकते. त्यामुळे होम क्वारंटाइनमध्ये असलेल्यांवर बारकाईने नजर ठेवणे गरजेचे झाले आहे.
स्वयंशिस्त पाळणे हा सद्य:स्थितीतील प्रभावी उपाय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:40 AM