सुनील काकडे
वाशिम : ग्रामीण भागात महिलांच्या बचत गटांची निर्मिती करण्यासह प्रशिक्षण देऊन महिलांना उद्योगांसाठी सज्ज करण्यासाठी उमेद अभियानातून जिल्ह्यात ६८ वर्धिनींना नेमणूक देण्यात आलेली आहे. कोरोना संकटामुळे वर्धिनींची कामे सुमारे दीड वर्षापासून थांबली होती. परिणामी, त्यांच्यावर बेरोजगारीचे संकट ओढवले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने १४ सप्टेंबरच्या अंकात राज्यातील तीन हजारांवर वर्धिनी मानधनापासून वंचित, या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेण्यात आली असून २३ सप्टेंबरपासून वर्धिनींच्या ग्रामीण भागातील फेऱ्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योगे बचत गटांच्या चळवळीलाही नवी उभारी मिळणार आहे.
ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील महिलांना बचतगटांमध्ये सहभागी करून त्यांना उपजीविकेच्या संधी निर्माण करून देण्याच्या उद्देशाने ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू करण्यात आले. याअंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती, बॅंक सखी, आर्थिक साक्षरता सखी, कृषी सखी, पशू सखी, ग्रामसंघ लिपिका, कृती संगम सखी आदी विभाग निर्माण करून कंत्राटी तत्त्वावर कर्मचारी भरण्यात आले. सोबतच खेडेगावात बचतगट स्थापनेविषयी प्रभावी जनजागृती करण्यासह महिलांचा बचत गटांमध्ये सहभाग निश्चित करणे, त्यांना बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्यासाठी वर्धिनींना नेमणूक देण्यात आली; मात्र कोरोनाचे उद्भवलेले संकट पाहता वर्धिनींच्या ग्रामीण भागातील फेऱ्यांवर निर्बंध लादण्यात आले होते. यामुळे मात्र काम नाही तर दाम नाही, यानुसार जिल्ह्यातील ६८ वर्धिनींचा रोजगार हिरावला गेला. यासंबंधी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेण्यात आली असून २३ सप्टेंबरपासून वर्धिनींच्या ग्रामीण भागातील फेऱ्या सुरू केल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाली.
..................
कोट :
ग्रामीण भागात महिला बचत गटांना जाणवणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात ६८ वर्धिनींना नेमणूक देण्यात आलेली आहे. मध्यंतरी कोरोनाच्या संकटामुळे वर्धिनींच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता मात्र संकट बहुतांशी निवळल्याने कोरोनाविषयक नियम पाळण्याच्या अटीवर वर्धिनींची कामे २३ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- सुधीर खुजे, जिल्हा अभियान व्यवस्थापक, वाशिम