प्रजासत्ताक दिन अर्थात २६ जानेवारी रोजी विद्यार्थी, लहान मुले, व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी लहान आकारातील कागदी किंवा प्लास्टिकपासून बनवलेले राष्ट्रध्वज खरेदी करतात. त्याच दिवशी सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी हे ध्वज इतरत्र टाकले जातात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. तसेच काहीवेळा कला व क्रीडा कार्यक्रमाप्रसंगी वैयक्तिकरीत्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज इतरत्र टाकले जातात. प्लास्टिकपासून बनलेले हे ध्वज लवकर नष्ट होत नसल्यामुळे बरेच दिवस तेथेच पडून राहतात. त्यामुळे न कळत राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हा अवमान टाळण्यासाठी प्लास्टिकपासून बनलेले राष्ट्रध्वजांची विक्री व वापर करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. राष्ट्रध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकाचे आद्यकर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना करणे दंडनीय अपराध आहे. वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले व जीर्ण, खराब झालेले किंवा रस्त्यावर, मैदानावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका स्तरावर तहसील कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करावेत. यासाठी शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणेमार्फत ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
प्लास्टिकपासून बनलेल्या राष्ट्रध्वजाची विक्री, वापर टाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:41 AM