कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणावर भर देण्यात येत आहे. रिसोड शहरात लसीकरण केंद्रासमोर गर्दी होत असून, लसीचा देखील तुटवडा जाणवतो. १३ मे रोजी लसीच्या दुसऱ्या डाेससाठी शहरातील नागरिकांनी सकाळपासूनच गेटच्या बाहेर रांगा केल्या होत्या. परंतु कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना परत जावे लागले. रिसोड तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी १५० कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला आणि ग्रामीण रुग्णालयाकरिता कोविशिल्डचा डोस उपलब्ध आहे. कोव्हॅक्सिनचा साठा संपल्याने चार ते पाच तासानंतर ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागले. चार ते पाच तास रांगेत उभे राहूनही डोस न मिळाल्याने ज्येष्ठ नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मागील दोन दिवसात नगरपरिषद शाळेमध्ये ३११ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. परंतु १३ मे ला डोस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली.
प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता कोव्हॅक्सिनचा डाेस उपलब्ध आहे आणि ग्रामीण रुग्णालयाकरिता कोविशिल्डचा डोस उपलब्ध आहे .
डॉ पी एन फोफसे,
तालुका आरोग्य अधिकारी रिसोड