वाशिम : जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांबरोबरच ग्रामीण भागातील ४० शासकीय, निमशासकीय इमारतींमघ्ये गृहविलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना आता गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागणार आहे.
पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जनजीवन अधिक प्रमाणात प्रभावित असल्याचे दिसून येते. दुसरी लाट ओसरत असल्याचे तूर्तास दिसून येत असले तरी शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामीण भागात अनेक जणांकडे स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहाची सुविधा नसल्याने कोरोनाबाधित रुग्ण व कुटुंबातील अन्य सदस्यांकडून एकच शौचालय व स्वच्छतागृहाचा वापर होतो. त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांनादेखील संसर्ग होत असल्याचे समोर आल्याने यापुढे अपवादात्मक परिस्थिती वगळता कोरोनाबाधितांना गृहविलगीकरणात राहता येणार नाही. ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणाचे निर्देश विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी आरोग्य विभाग, ग्रामपंचायतींना दिलेले आहेत. त्यानुसार शासकीय, निमशासकीय इमारती अधिग्रहित करण्यात येत असून, तेथे संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली जात आहे. आतापर्यंत ४० शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध केली. याशिवाय १५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही विलगीकरणाची सुविधा आहे. आरोग्य केंद्रात प्रत्येकी सहा बेड तसेच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनही उपलब्ध केली जाणार आहे. ‘संस्थात्मक विलगीकरण’ मोहिमेस ग्रामीण भागातील काही सद्गृहस्थांचेदेखील मोलाचे सहकार्य लाभत असून, शैक्षणिक संस्थांचे अध्यक्ष हे विलगीकरणासाठी शाळेच्या इमारती नि:शुल्क उपलब्ध करून देत असल्याचे दिसून येते.
००००००००००००
१५ व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध !
जिल्हा परिषद शाळा यासह शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये पिण्याचे पाणी, पंखा, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगातून निधी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे. १५ व्या वित्त आयोगाचा शिल्लक निधी व प्राप्त निधी यामधून अधिकाधिक निधी हा आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करण्यावर खर्च करावा, अशा सूचनाही वरिष्ठांनी दिल्या आहेत.
०००००००००००
बॉक्स
संस्थात्मक विलगीकरणासाठी निवडलेली आरोग्य केंद्रे - १५
उपलब्ध खाटा - ९०
उपलब्ध ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशिन - ३०
०००००००००००००
आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर
ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर दिला जात आहे. संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणाची सुविधा असावी म्हणून शासकीय, निमशासकीय इमारतींची चाचपणी केली जात आहे. जिल्हा परिषद शाळेच्या बहुतांश इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेण्याच्या सूचनाही ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.
०००००
कोट बॉक्स
ग्रामीण भागात आरोग्य सेवा बळकट करण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. प्रारंभिक टप्प्यात १५ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी सहा बेड व दोन ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशिनही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- चक्रधर गोटे,
सभापती, शिक्षण व आरोग्य
जिल्हा परिषद वाशिम
००००
ग्रामीण भागात गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरण म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळेच्या इमारती व अन्य शासकीय, निमशासकीय इमारतींमध्ये सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
- वसुमना पंत
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद वाशिम