लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मुंबई उच्च न्यायालयाने जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी सुधारित केलेल्या १२ सप्टेंबर २०१७ च्या धोरणास स्थगिती दिल्यानंतर २७ फेब्रुवारी २०१७ च्या धोरणानुसारच ही बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षकांकडून नव्याने अर्ज मागविण्यात येत असून, यासाठी २३ आॅक्टोबरच्या रात्री ११.५९ वाजेपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. तथापि, आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ट्रान्सफर पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिक्षकांना अर्ज करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीनंतरही अनेक शिक्षक अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे. जि.प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसाठी राज्य शासनाने अंशत: सुधारित केलेल्या निर्णयाला काही जिल्हा परिषद शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर २०१७ च्या शासन निर्णयास स्थगिती देतानाच शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या २७ फेब्रुवारीच्या धोरणानुसार करण्याचे स्पष्ट आदेश दिले. न्यायालयाच्या याच आदेशानुसार बदली अधिकार प्राप्त, तसेच २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या बदली धोरणानुसार बदली अधिकार प्राप्त शिक्षक व चौथ्या फेरीत बदलीसाठी अर्ज केलेल्या सर्व शिक्षकांना आता नव्याने सुधारीत अर्ज करणे आवश्यक झाले आहे. दरम्यान, या प्रक्रियेसाठी २७ फेब्रुवारी २०१७ च्या निर्णयानुसार विनंती बदल्या करण्यासाठी सुधारीत अर्जांचे नमुने शासनाच्या बदली पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले असून, हे अर्ज २३ आॅक्टोबर २०१७ रोजी रात्री ११.५९ पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. या पोर्टलवर शिक्षकांकडून अर्ज भरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु या पोर्टलवर ओव्हरलोड झाल्याने ते वारंवार ठप्प होत असून, येत्या २३ आॅक्टोबरपर्यंत शिक्षकांना आॅनलाईन अर्ज सादर करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे येत्या २३ आॅक्टोबरच्या अंतिम मुदतीनंतर अनेक शिक्षक अर्ज करण्यापासून वंचित होण्याची भिती निर्माण झाली आहे. एकट्या वाशिम जिल्ह्यात या प्रक्रि येत बसणारे जवळपास दीड हजार शिक्षक असून, त्यामधील अद्याप निम्म्याही शिक्षकांना अर्ज करणे शक्य झाले नाही.
‘सर्व्हर’ ठप्प; बदलीपात्र शिक्षकांची पंचाईत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:24 PM
आॅनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले ट्रान्सफर पोर्टल वारंवार ठप्प होत असल्याने शिक्षकांना अर्ज करणेच कठीण झाले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीनंतरही अनेक शिक्षक अर्ज सादर करण्यापासून वंचित राहण्याची भिती निर्माण झाली आहे.
ठळक मुद्देजिल्हांतर्गत बदली प्रक्रियाअर्जासाठी केवळ २३ आॅक्टोबरपर्यंत मुदत