लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) : येथून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या घनदाट जंगलाने व्यापलेल्या पांगराबंदी या गावालगतच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनविभाग व सामाजिक संस्थांच्या चमूने तब्बल सहा ते सात तास अथक परिश्रम घेतले. शेवटी त्यास यश मिळून बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढून त्याची अकोला येथे रवानगी करण्यात आली. रविवार, १४ एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकारामुळे पांगराबंदी शिवारातील ग्रामस्थांना जवळून बिबट्याचे दर्शन घडले.याबाबत अधिक माहिती अशी, की पांगराबंदी गावालगत गंगाराम आनंदा घुगे यांचे शेत आहे. नित्यनेमानुसार घुगे हे रविवारी सकाळी शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना शेतातील कोरड्या विहिरीतून डरकाळीचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना आतमध्ये बिबट्या असल्याचे दिसून आले. याबाबत घुगे यांनी तत्काळ मेडशी येथील वनपरिक्षेत्राधिकाºयांना माहिती दिली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मेडशी वनपरिक्षेत्राधिकारी सिद्धार्थ वाघमारे हे आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. आधी विहिरीत दोरी बांधून लाकडी खाट सोडण्यात आली. मात्र, तीन तास परिश्रम घेवूनही बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले नाही. तोपर्यंत घटनास्थळी मंगरूळपीर येथून ‘वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन’ची चमू, मालेगाव येथून वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेची चमू दाखल झाली. पाठोपाठ पुसद येथून मुकब्बीरचे पथकानेही हजेरी लावून विहिरीत जाळे सोडले. अखेर सात तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढून अकोला येथील वनविभागात त्याची रवानगी करण्यात आली. हा सर्व घटनाक्रम पाहण्याकरिता पांगराबंदीसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
सात तासांच्या अथक परिश्रमांती बिबट्याला काढले विहिरीतून बाहेर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 4:56 PM