जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंताही वाढली आहे. वाशिम शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांनी आता तरी सतर्क होणे आवश्यक ठरत आहे. मात्र, नागरिक फारशी काळजी घेत नसल्याने वाशिम तालुक्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून येत असल्याचे शुक्रवारीदेखील समोर आले. शुक्रवारी वाशिम तालुक्यात सर्वाधिक २१७ रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात मृत्यूसत्रही सुरूच असल्याचे दिसून येते. शुक्रवारी आणखी सातजणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. ५९७ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम २१७, मालेगाव तालुक्यातील ११०, रिसोड तालुक्यातील १११, मंगरूळपीर तालुक्यातील ४५, कारंजा तालुक्यातील ३१ आणि मानोरा तालुक्यात ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ४३ बाधितांची नोंद झाली असून ३३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
०००००००००००
ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव
जिल्ह्यात ग्रामीण भागातही मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्या तुलनेत ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना शहरी भागातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. ग्रामीण भागात गृहविलगीकरणाची सुविधादेखील फारशी चांगली नसल्याने अनेक रुग्ण पाच ते सात दिवसांनंतर घराबाहेर पडत असल्याची चर्चा आहे. गावातील संबंध म्हणून कुणी याबाबत तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने कोरोनाची साखळी तुटणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.