लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वृक्ष लागवडीला प्रोत्साहन व गती मिळण्यासाठी विविध स्वरूपातील उपक्रम राबविण्यात येत असून सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत शालेय विद्यार्थ्यांच्या हाताने मातीचे आवरण असलेले तब्बल ७ हजार सिड बॉल तयार केले आहेत. या बॉलमधून अंकुरलेल्या रोपट्यांचे विविध ठिकाणी रोपण केले जाणार आहे. तथापि, पर्यावरणाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणाºया या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘मी वाशिमकर ग्रुप’ने सक्रीय पुढाकार घेतला.गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांसाठी बेसुमार वृक्षतोड झाली. यामुळे मात्र पर्यावरणाचा प्रचंड प्रमाणात ºहास होवून पर्जन्यमानावर त्याचा मोठा परिणाम होवून पावसाचे प्रमाण घटले. अधिवास हिरावला गेल्याने कावळा, चिमणी, कबुतर, पोपट यासह इतर पशुपक्षी दिसेनासे झाले. अवैध वृक्षतोडीमुळे कधीकाळी गर्द झाडांनी व्यापल्या जाणारा जंगल परिसर आता मात्र बोडखा दिसू लागला. ही बाब लक्षात घेवून शासनाने गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी वृक्षलागवड मोहिम राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यास वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शाळांमध्ये शिकणाºया चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्येही वृक्षलागवड आणि संवर्धनाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी त्यांचा प्रत्यक्ष सहभाग घेत त्यांच्याकडून मातीचे आवरण असलेले सिड बॉल तयार करून घेण्याचा उपक्रम ‘मी वाशिमकर ग्रुप’ या सामाजिक संघटनेच्या युवकांनी हाती घेतला आहे. यामाध्यमातून आतापर्यंत सुमारे ७ हजार सिड बॉल तयार झाले आहेत. त्यातून अंकुरणाºया रोपट्यांची वाशिम शहरानजिकच्या एकबुर्जी प्रकल्प परिसर, वाशिम-पुसद रस्त्यावरील जागमाथा परिसरात लागवड केली जाणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी तयार केले सात हजार ‘सिड बॉल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 5:15 PM