केंद्र तसेच राज्य सरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे. परंतु महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील तसेच कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू न झाल्याने या कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. यासंदर्भात वाशिमसह राज्यभरातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी गत चार वर्षांपासून लढा उभारला. वाशिम येथील हुकूमचंद बागरेचा, सुशीला गोटे, वाय.पी. अडागळे, लीला बक्षी, प्रभा पाटील आदी कर्मचा-यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला तसेच आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांच्यामार्फतही महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना साकडे घातले. आमदार सरनाईक यांनी ना. ठाकूर यांच्याकडे या विषयासंदर्भात पाठपुरावा केला. राज्यभरातूनही सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी समोर आल्याने अखेर महिला व बालविकास विभागाने १५ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डातील तसेच कुटुंब व बालकल्याण योजनेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला. यामुळे उतारवयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सेवानिवृत्त योजना कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:39 AM