वाशिम : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या २०२३ या वर्षाच्या कार्यकाळाकरीता नवीन जिल्हाध्यक्षाच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये वाशिम जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य शाम बढे यांची वर्णी लागली. या निवडीमुळे भाजपाच्या ताब्यात नसलेल्या एकमेव रिसोड विधानसभा मतदारसंघावर श्रेष्ठींनी लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येते.
विहित कार्यकाळ पूर्ण झाल्याने राज्यातील अनेक जिल्हाध्यक्ष बदलून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याचे वारे गत काहि दिवसांपासून वाहत होते. वाशिम जिल्हाध्यक्ष पदासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये अनेक नावे चर्चेत होती. मात्र प्रदेशाध्यक्षांनी नाव निवडताना सर्वसमावेशक नवा चेहरा समोर आणल्याने सर्वांनाच धक्का बसला. जिल्हाध्यक्ष निवडताना भाजपने विधानसभा व लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील जातीय समीकरणाचे गणित लक्षात घेत आणि सर्वाना प्रतिनिधीत्व मिळावे हे राजकीय गणित समोर ठेवत शाम बढे यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील तीनपैकी एकमेव रिसोड - मालेगाव विधानसभा मतदारसंघ मागील तीन टर्मपासून भाजपाच्या ताब्यात नाही. शाम बढे यांच्या निवडीमुळे रिसोड विधानसभा मतदारसंघाला झुकते माप मिळाले. २०१३ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत मेडशी गटातून बढे यांनी दणदणीत विजय मिळविला होता. त्यानंतर २०२० मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत मेडशी गट राखीव झाल्याने त्यांना राजरा गटातून निवडणूक लढवावी लागली. स्वपक्षातील विद्यमान सदस्याने बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने आणि दुसऱ्या बाजूने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणूक रिंगणात असतानाही बढे यांनी मताधिक्याने विजय मिळवित पक्षश्रेष्ठिंचा विश्वास सार्थ ठरविला. पक्षातील योगदान व सर्वसमावेशक चेहरा लक्षात घेता भाजपाने शाम बढे यांना बढती देत वाशिम जिल्हाध्यक्षपदी संधी दिली.