वाशिम : राज्यात निर्बंध असलेला शंकरपट (बैलांची शर्यत) पुन्हा सुरू करण्यात यावा, अशी मागणी येथील शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
यासंदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रात शंकरपटाला सुमारे ३५० वर्षांची परंपरा लाभलेली आहे. असे असताना बैलास प्राणी संरक्षित (जंगली) यादीत समाविष्ट करून शंकरपटावर निर्बंध लादण्यात आले. इतर राज्यात त्यास परवानगी असताना महाराष्ट्रातील जिल्ह्यावरच हा अन्याय का? तथापि, कोरोना संकटामुळे शेतकरी आधीच हवालदिल झाले आहेत. अशात बैलगाडी शर्यत ही बंद असल्याने त्यावर अवलंबून असणारे कासरेवाले, टेम्पोवाले, चहा, सरबत, वडापाव, कलिंगड, काकडी विक्रेत्यांचे व्यवसायही ठप्प झाल्याने शंकरपट सुरू करण्यास शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष गणेश अढाव, आतिष वर्मा, शे. हसन शे. कालू, विलास मोरे, स. अ. केंद्रे, सै. मोहसीन, गजानन इंगोले, संजय ताकतोंडे, संदीप खरात, संजय वानखेडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
.............
पदाधिकाऱ्यांची आमदारांशी चर्चा
जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देऊन निवेदन दिल्यानंतर शेतकरी संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार लखन मलिक यांचीही भेट घेऊन शंकरपट सुरू करण्यासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.