वाशिम, दि. 0७ - महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत निर्माण करायचा असेल, तर त्यांचे विचार युवकांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेत रत्नगिरी जिल्ह्याच्या मंडणगड येथील गांधीवादी कार्यकर्ते तथा लेखक बापू शेठ यांनी त्यांच्या पाच सहकार्यांच्या सहाय्याने ह्यरत्नागिरी ते सेवाग्रामह्ण अशी शांती रथयात्राच काढली आहे. ह्यरत्नागिरी ते सेवाग्रामह्णदरम्यान येणार्या शहरांतील महाविद्यालयात कार्यक्रम घेऊन महात्मा गांधी यांचे विचार युवकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न ते करणार आहेत.महात्मा गांधी यांच्या आचार-विचारांचे व एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे केवळ भारतीयांनाच नव्हे, तर संपूर्ण जगालाच आकर्षण आहे. विशेष करून आजची तरुण पिढी, विचारवंत, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञानांसह विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनाही गांधीजींचे विचार, त्यांची जीवननिष्ठा व त्यांचे जीवनदर्शनाबाबत कमालीचे आकर्षण आहे. हीच बाब लक्षात घेऊन रत्नागिरी येथील लेखक तथा गांधीवादी कार्यकर्ते बापू शेठ, तसेच त्यांचे सहकारी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते दीपक चंद्रकांत घोषाळकर, सामाजिक कार्यकर्ते वैभव सुधाकर नारकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शंकर घोषाळकर आणि सामाजिक कार्यकर्ते राजाराम शंकर राऊत यांनी एका अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत ते रत्नागिरी ते सेवाग्राम येथील गांधी आश्रमापर्यंत शांती रथयात्रा काढून विविध ठिकाणच्या महाविद्यालयात कार्यक्रमांचे आयोजन करून युवकांना गांधीजींची जीवनशैली, त्यांचे आचार- विचाराबाबत मार्गदर्शन करण्यासह जागतिक शांततेचे आवाहन करीत आहेत. ही रथयात्रा रत्नागिरी येथून निघाल्यानंतर मलकापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, राळेगण सिद्धी, औरंगाबाद, जालना अशी फिरून शुक्रवारी वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. पुढे यवतमाळ मार्गे ही रथयात्रा वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे दाखल होणार आहे.
युवकांमध्ये गांधीजींचे विचार रुजविण्यासाठी ‘शांती’ यात्रा!
By admin | Published: October 08, 2016 2:13 AM