- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘ती’ दिसायला सुंदर असण्यासोबतच शिक्षणातही हुशार होती. अंगी संभाषण कौशल्य असल्याने स्थानिक टी.व्ही. चॅनेलवर वृत्त निवेदिका म्हणून ‘ती’ने काम सुरू केले. दुसरीकडे पोलिस दलात दाखल होण्यासाठी दैनंदिन सरावही सुरू होता; मात्र, ऐन उमेदीच्या वयात एका माथेफिरू युवकाने एकतर्फी प्रेमातून ‘ती’च्यावर अॅसीड हल्ला केला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. चेहरा विद्रूप झाला, एक डोळा आणि एक कान कायमचा गमावला गेला; पण अशाही स्थितीत ‘ती’ने हिंमत न हारता कठीण संघर्षातून जीवनाला आकार दिला. नुकताच प्रदर्शित झालेला ‘छपाक’ सिनेमा पाहून प्रेरित झालेली वाशिममधील तीच ‘अॅसीड अटॅक सर्व्हायव्हर’ अर्चना शिंदे हिने ४ जानेवारी २००३ रोजी घडलेल्या या घटनेनंतर गत १६ वर्षांमध्ये तिच्यावर ओढवलेले काही बिकट प्रसंग ‘लोकमत’कडे कथन केले.४ जानेवारी २००३ रोजी अर्चना नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजताच्या सुमारास ‘मॉर्निंग वॉक’ला जात होती. अशात मागून मानेवर कुणीतरी ज्वलनशिल द्रव फेकल्याची जाणीव तिला झाली, ते इतर काही नव्हे; तर अॅसीड होते. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर चेहºयावरही अॅसीड फेकले गेले. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरू युवकाने केलेल्या या कृत्यामुळे मात्र अर्चनाची मान व चेहरा पूर्णत: भाजल्या गेला. यात उजवा डोळा, आणि उजवा कान कायमचा निकामी झाला. तिच्यावर सलग ७ वर्षे उपचार चालले, त्यातील ७ महिने ती दवाखान्यातच भरती होती. लाखो रुपयांचा खर्च झाला. अनेकांनी आर्थिक मदतीचे पोकळ आश्वासन दिले; पण प्रत्यक्ष मदत कुणीच केली नाही, अशी खंत व्यक्त करण्यासोबतच आई-वडिलांनी आयुष्यभर काबाडकष्ट करून जमविलेला सर्व पैसा खर्च करून मला पुनर्जन्म दिल्याचा अभिमान वाटतोय, असे अर्चना सांगते. किराणा दुकान चालवून ‘ती’ स्वत:सोबतच आई, वडिलांचाही करते सांभाळ
अर्चना पुर्वी आई-वडिल व भावासोबत जुने शहरात वास्तव्याला होती; मात्र समाजातील बहुतेकांकडून जळकी, लंगडी, आंधळी असे संबोधून वारंवार हेटाळणी झाल्याने तेथील घर विकून ८ वर्षांपासून ती आई-वडिलांसोबत शहरातील अल्लडा प्लॉट परिसरात वास्तव्याला आहे. तेथेच तिने सिद्धीविनायक शॉप या नावाने किराणा दुकान सुरू केले. यामाध्यमातून चरितार्थ चालत असल्याचे अर्चनाने सांगितले. किराणा दुकानासाठी लागणारे साहित्य वाशिमच्या मार्केटमधून खरेदी करित असल्याने संपूर्ण मार्केट मला माझ्या नावाने ओळखते, असे अर्चनाने अभिमानाने सांगितले. ‘छपाक’मुळे पूर्ण हिंमतीने समोर येण्याचे बळ मिळाले
दिपीका पदुकोन या गाजलेल्या अभिनेत्रीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘छपाक’ या सिनेमात कसदार अभिनय करून माझ्यासारख्या असंख्य अॅसीड हल्ला पिडित युवतींचा संघर्ष जगासमोर आणलाय. त्यामुळेच मला देखील पूर्ण हिंमतीने समोर येण्याचे बळ मिळाले, असे अर्चना शिंदे हिने सांगितले. एकतर्फी प्रेमातून युवतींवर अॅसीड हल्ला करून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणाºयांना कठोर शिक्षा मिळण्यासोबतच त्यांना समाजातून कायमचे बहिष्कृत करावे, समाज, पोलिस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेनेही अॅसीड हल्ला पिडित युवतींना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, ‘अॅसीड’ विक्रीचे नियम अधिक कठोर व्हायला हवे, अशा अपेक्षाही अर्चनाने व्यक्त केल्या.