वाशीम : भारतीय सैन्यात २४ वर्ष सेवा देऊन निवृत्त झालेले चिखली (झ़ोलेबाबा ) (ता. मंगरूळपीर ) येथील सुपुत्र गणेश राजाराम वाघ यांचे शेलुबाजार व चिखली येथे ६ फेबुवारीला जंगी मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
चिखली येथील सैनिक गणेश राजाराम वाघ हे भारतीय सैन्याच्या सीमा सुरक्षा बलात सन २००० साली सेवेत रुजू झाले. त्यांनी भारताच्या मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, छत्तीसगड,जम्मू कश्मीर, पंजाब, पश्चिम बंगाल आदि भागात सीमेचे रक्षण करण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. २४ वर्ष देशसेवा केल्यानंतर ३१ जानेवारीला निवृत्त होऊन ते ६ फेब्रुवारी रोजी शेलुबाजार येथे दाखल झाले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहून सेवानिवृत्त सैनिक गणेश वाघ यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी शेलुबाजार येथील साई मंदिर ते बस स्टॅन्ड चौक अशी स्वागत रॅली काढण्यात आली. बसस्थानक चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. डीजेच्या देशभक्तीपर गितांनी परीसर दणाणून गेला होता. त्यांचे मुळगाव असलेल्या चिखली येथे रॅली येताच ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले. महिलांनी घरासमोर रांगोळी काढून वाघ यांचे औक्षण करीत स्वागत केले. चिखली येथील जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांनीही गणेश वाघ यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. संत झोलेबाबा संस्थानमध्ये गणेश वाघ व त्यांच्या कुटुंबियाचा नागरी सत्कार करण्यात आला.