शेलूबाजार : कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर रुग्णांनी येथील आरोग्यवर्धिनी केद्रांकडे पाठ फिरविल्याचे एका महिन्याच्या ‘ओपीडी’च्या (बाह्यरुग्ण तपासणी) आकडेवारीवरून दिसून येते. एका महिन्यात केवळ २०० रुग्णांची नोंद झाली. एरव्ही सरासरी ३५०० ते ४००० च्या आसपास तपासणी असते.
शेलूबाजार येथील आरोग्यवर्धिनी केंद्रांतर्गत जवळपास ३० गावे येतात. येथे मोठी आठवडी बाजारपेठ असल्याने परिसरातील ३० ते ४० खेड्यांतील नागरिक याच बाजारपेठेत येतात. इतर प्राथमिक आरोग्य केद्रांतील गावातील रुग्णसुद्धा उपचारासाठी त्याच आरोग्यवर्धिनी केंद्राची निवड करतात म्हणून कोरोना काळापूर्वी येथे दिवसाला १०० ते १५० ओपीडी व्हायची. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या भीतीने तसेच कोरोना चाचणी करतील या भीतीने रुग्ण हे या आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचारासाठी येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. दोन दिवसांत होणारी ओपीडीची संख्या एका महिन्यात होते आहे. यावरून नागरिकांच्या मनातील भीती कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. सुरुवातीला लसीकरण करण्यासाठीसुद्धा आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना गावोगावी फिरून लसीकरण करावे लागले.
...
रुग्णांनी तपासणी करावी
मागील कोरोना काळापासून आरोग्यवर्धिनी केंद्रात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णाची संख्या फार कमी झाली आहे. रुग्णांनी निसंकोचपणे आरोग्यवर्धिनी केंद्रात येऊन उपचार करून घ्यावे. कोरोना चाचणी करणे प्रत्येकांच्या फायद्याची आहे. सोबतच लसीकरण करून घेणे तेवढेच जरूरीचे आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.