मालेगाव ते हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. याअंतर्गत रस्त्यावरील वीज वाहिन्यांची शिफ्टिंग करण्यात आली. हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले. शिरपूरपासून दोन किलोमीटर अंतरावर उभारण्यात आलेले विद्युत खांब योग्यप्रकारे न लावल्याने झुकलेल्या अवस्थेत आहेत. तसेच तेथील एक ट्रांसफार्मर सुद्धा उभारणी केल्यानंतर काहीच दिवसांत झुकला. त्यास योग्यप्रकारे तान देण्यात आला नाही. यामुळे जागोजागी विजेच्या तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. थोड्याही हवेने वीज तारांचे घर्षण होत असल्याचा प्रकार घडत असून वाहिनी तुटून वीजपुरवठादेखिल खंडित होत आहे.
१९ मार्च रोजी असाच प्रकार घडला. तेव्हापासून ट्रान्सफार्मरवरील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. हळद काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना हळद उकळणीसाठी पाण्याची आवश्यकता आहे; मात्र वीज पुरवठ्याअभावी मोटारपंप बंद असून हळद काढणीची कामे थांबली आहेत. इतर पिकांना सिंचनासाठी अथवा गुरांना पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना विहिरीतून पाणी शेंदावे लागत आहे. वीज वाहिनीच्या शिफ्टींगचे काम सुरू असताना लोकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या; परंतु त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले.
.................
राष्ट्रीय महामार्गावरील वीज वाहिन्यांची शिप्टींग करत असताना संबंधित कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने काम केले. महावितरणनेही लक्ष दिले नाही. ट्रांसफार्मर व विद्युत खांब उभारण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. हळद काढण्याच्या कामातही यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
दिलीपसिंह परिहार
शेतकरी, शिरपूर जैन