विविध स्वरूपाच्या करांची थकबाकी वाढल्याने पगार थकले आहेत. १७ सदस्य संख्या असलेली शिरपूर ग्रामपंचायत जिल्ह्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत म्हणून गणली जाते. गावामध्ये पाच हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत, तर दोन हजारांहून अधिक नळ कनेक्शनधारक आहेत. पाच हजार कुटुंबांनी व दोन हजार नळधारकांनी नियमितपणे घर कर व पाणीपट्टी कर भरल्यास अथवा ग्रामपंचायतने विशेष पुढाकार घेतल्यास ग्रामपंचायतच्या खात्यात मोठा निधी उपलब्ध होऊ शकतो; परंतु असे होताना दिसत नाही. परिणामत: सामान्य फंडातून करावयाची कामे रखडत आहेत. मागील काही वर्षांपासून गावातील लोकांकडे २.६० कोटी रुपये ग्रामपंचायतचा विविध स्वरूपाचा मालमत्ता कर थकीत झाला आहे. याचा परिणाम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावरसुद्धा होत आहे. कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांचा पगार थकीत झाला आहे. यापूर्वीही असा प्रकार घडला होता. मात्र, २०२० मध्ये प्रशासकांनी खर्चात काटकसर करून कर्मचाऱ्यांचे थकीत पगार देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. आता पुन्हा कर्मचाऱ्यांचा सहा महिन्यांचा पगार थकला आहे, तसेच दिव्यांगांना ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून दिला जाणारा पाच टक्के लाभांशसुद्धा अद्याप वाटप करण्यात आला नाही.
००००००००००००००००००००
२.६० कोटी थकीत कराचा परिणाम
ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे ग्रामपंचायतीच्या स्थानिक उत्पन्नातून करावे लागते. ग्रामपंचायतीचे प्रमुख उत्पन्न म्हणजे ग्रामस्थांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांपोटी होणारी कर वसुली आहे; परंतु शिरपूर ग्रामपंचायतअंतर्गत तब्बल २.६० कोटी रुपयांचा कर थकीत आहे. विविध थकीत करांमुळे सामान्य फंडात निधी अतिशय तुटपुंजा असतो. त्यातून काही महत्त्वाची कामे केली जातात. याच कारणामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा चार ते पाच महिन्यांचा पगार थकीत आहे.
०००००००००००००००००००००००
कोट :
कोरोना संसर्गामुळे ग्रामपंचायतीची करवसुली योग्य प्रकारे होऊ शकली नाही. आता परिस्थिती सामान्य होत असल्याने लवकरच कर वसुली होईल व कर्मचाऱ्यांचा थकीत पगार अदा करण्यात येईल. दिव्यांग निधीमधून लवकरच आवश्यक वस्तूंचे वाटप केले जाईल.
-भागवत भुरकाडे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत शिरपूर जैन