लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन: देशातील गाळयुक्त अज्ञात खोर्यांत हायड्रोकार्बनचा साठा असल्याची शक्यता तपासण्याची मोहीम तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळामार्फत (ओएनजीसी) करण्यात येत आहे. ही मोहीम वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सुरू झाली आहे; परंतु या मोहिमेसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि इतर साहित्यामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. या नुकसानीसाठी प्रशासनाकडून मोबदला दिला जात असला तरी, तो अतिशय नगण्य असल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. देशातील गाळयुक्त खोर्यात हायड्रोकार्बनचे साठे असल्याची शक्यता तपासण्यासाठी सेस्मिक डेटा संकलित करण्याचे काम ओएनजीसीकडे सोपविण्यात आले आहे. प्रत्यक्षात हे काम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित सेवा पुरवठादाराच्या माध्यमातून करून घेण्यात येणार आहे. या साठी अल्फा जीओ इंडिया या संस्थेच्यावतीने वाशिम जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यासाठी राज्याच्या महसूल व वन विभाग मंत्रालयाकडे सहकार्य करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकार्यांना पत्र पाठवून सूचित करण्यात आले. त्यानुसार जिल्हाधिकार्यांकडून सर्वच तहसीलदारांना पत्र पाठवून महसूल मंडळ अधिकारी आणि तलाठय़ांना संबंधित संस्थेला त्यांनी निश्चित केलेल्या जागेवर सर्वेक्षण करण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले होते. आता या प्रक्रियेला मालेगाव तालुक्यात प्रारंभ झाला आहे. गेल्या ८ ते १0 दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत हरभरा, गहू ही पिके असलेल्या शेतातून खोदकामाचे साहित्य आणि वाहने नेण्यात येत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. यासाठी शेतकर्यांना तत्काळ मोबदला दिला जात असला तरी, झालेल्या नुकसानाच्या तुलनेत तो खूप कमी आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सद्यस्थितीत मिर्झापूर, पांगरखेडा शिवारात हे काम सुरू असून, नुकसानापोटी मिळालेल्या तुटपुंज्या मोबदल्याची माहिती शेतकर्यांनी मालेगाव-रिसोडचे आमदार अमित झनक यांनाही दिली आहे.
हायड्रोकार्बन साठय़ाच्या तपासणीसाठी वापरण्यात येत असलेली वाहने आणि खोदकामाचे साहित्य शेतातून फिरविण्यात येत आहे. त्यामुळे तूर, हरभरा, गहू या पिकांचे मोठे नुकसान होत असून, या नुकसानापोटी मिळणारा मोबदला नगण्य आहे. नुकसानाचे प्रमाण लक्षात घेऊनच प्रशासनाने शेतकर्यांना मोबदला द्यावा. -अर्जुना सोमटकर, शेतकरी, मिर्झापूर