शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर-औरंगाबाद द्रुतगती मार्गावरील चांडस येथील धाब्यासमोर रात्रीच्या वेळी अनेक ट्रकचालक विश्रांतीसाठी ट्रक उभे करीत असतात. मागील काही दिवसांपासून ट्रकमधून डिझेल चोरीला जाण्याच्या घटना घडू लागल्या. त्यामुळे ट्रकचालकासह धाबाचालकही वैतागले होते. अशातच १ फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजताच्या सुमारास धाबाचालक दिलीप नायबराव देशमुख, रा. डोंगरकिन्ही व वाॅचमेन अशोक नखाते हे पाळत ठेवून बसले होते. त्यावेळी चौघेजण ट्रकमधून डिझेल काढताना दिसून आले. धाबाचालकाने काही सहकाऱ्यांच्या मदतीने त्यापैकी संतोष अंबादास वाघमारे रा. हरपाळा जि. जालना, राहुल किसन कोकाटे व आकाश गणेश कोकाटे रा. दोघेही राजनगाव ता. बदनापूर जि.जालना यांना पकडून धाब्यामध्ये ठेवले तर इतर एक जण फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी शिरपूर पोलिसांना माहिती मिळताच, जमादार माणिकराव खानझोडे, पोलीस वाहन चालक शाहीदभाई आदींनी तात्काळ घटनास्थळ गाठून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तर चौथा आरोपी रंगनाथ बाजीराव डफडे रा. चांगलवाडी ता. अंबड जि. जालना हा फरार आहे. आरोपींजवळून २ कॅनमध्ये असलेले ५० लिटर डिझेल व १२ रिकाम्या कॅनसह गुन्ह्यात वापरलेले एम. एच. २६ व्ही ३१४१ क्रमांकाचे चारचाकी वाहन ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र वानखेडे व पोलीस नायक कृष्णा नागरे हे करीत आहेत. वाहनातून डिझेल चोरी करणारे जालना जिल्ह्यातील रॅकेट असल्याचे या घटनेवरून निष्पन्न होत आहे.
तीन चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 9:21 AM