लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम): दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ºहास थांबविण्यासाठी वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. त्यामुळे वृक्ष संवर्धनाच्या कार्यात हातभार लावण्याचा प्रयत्न शिरपूर पोलीस करीत असून, याच उद्देशाने पोलीस स्टेशनच्या आवारात दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे जगविण्याची त्यांनी जबाबदारी घेतली आहे. या वृक्षांना पाणी घालण्यासाठी पोलीस कर्मचाºयांनी वेळा आणि दिवसही वाटून घेतले असून, त्यांच्या या उपक्रमामुळे झाडे चांगलीच वाढली आहेत. कायदा-सुव्यवस्थेसाठी दक्ष राहणाºया पोलिसांना इतर सामाजिक कार्यासाठी फारसा वेळ मिळत नाही. तथापि, मिळेल त्या वेळेतूनही समाजाचा घटक म्हणून आपले दायित्व पार पाडण्याचे कोणतीही संधी पोलीस सोडत नाहीत. याचा प्रत्यय शिरपूर येथे येत आहे. शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाºयांनी अनेक रोपांची लागवड केली. त्यातील ५० हून अधिक झाडे पोलीस स्टेशनच्या आवारातच लावली. केवळ वृक्षारोपण करून चालणार नसल्याचे त्यांना चांगले माहिती होते. त्यामुळे ही झाडे जगविण्याचा संकल्पही त्यांनी केला. यासाठी चर्चा करून झाडांना पाणी घालण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि या कामासाठी वेळा व दिवस निश्चित केले. ही जबाबदारी घेण्यापूर्वी जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी ‘ट्री गार्ड’ही लावले. पावसाळा संपला की या झाडांना पाणी देण्याची नितांत गरज असते. त्यामुळे पोलीस कर्मचारी काळजीने या झाडांना पाणी घालतात. आता उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पाण्यावाचून जीव कासाविस होत आहे. तसेच वृक्षांनाही पाण्याची गरज असल्याचे लक्षात घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी रामेश्वर जोगदंड, रमेश गोडघासे यांच्यासह इतर कर्मचारी वेगवेगळ्या दिवशी आळीपाळीने झाडांना पाणी देण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच दोन वर्षांपूर्वी परिसरात लावण्यात आलेली झाडे आता बरीच मोठी झाली आहेत.
शिरपूर पोलिसांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 3:22 PM