लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम) : येथील पोलिस स्टेशनकडे असलेले एकमेव चारचाकी वाहन नादुरूस्त होण्याचा प्रकार नेहमीचाच झाला आहे. बुधवारी देखील बारावीच्या परीक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी गेलेल्या या वाहनाचे ‘एक्सेल’ तुटल्याने अधिकाºयांची तारांबळ उडाली. शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत ५९ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याची जबाबदारी पोलिसांना पार पाडावी लागते. त्यासाठी मात्र शिरपूर पोलिस स्टेशनला एकमेव चारचाकी वाहन देण्यात आले असून दैनंदिन गस्तीची कामे यामुळे प्रभावित होत आहेत. अशातच हे वाहन नादुरूस्त राहत असून त्याचा प्रत्यय बुधवारी पुन्हा एकवेळ आला. बारावीची परीक्षा सुरू असणाºया पीर मोहम्मद हायस्कूल या केंद्राला भेट देण्यासाठी गेलेले नवनियुक्त ठाणेदार संजय खंदाडे यांना वाहनाचे ‘एक्सेल’ तुटल्याने वाहन तिथेच ठेवून परीक्षा केंद्रापासून पोलिस स्टेशनपर्यंत पायदळ जावे लागल्याने त्यांची गैरसोय झाली. काही दिवसांपूर्वी एकच वाहन आणि तेही परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आल्याने आरोपींना पायदळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेल्याच्या मुद्यावरून चांगलाच वाद झाला. याप्रकरणी पोलिस स्टेशनच्या आवारात काही महिलांनी पाच दिवस साखळी उपोषण केले. तथापि, शिरपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया गावांची संख्या व लोकसंख्येची व्याप्ती पाहता किमान आणखी एक वाहन शिरपूर पोलिस स्टेशनला देण्यात यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
शिरपूर पोलिसांच्या एकमेव वाहनाचे तुटले ‘एक्सेल’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 6:21 PM