शिरपूर : गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असल्यामुळे अत्यंत वाईट अवस्था झालेल्या वाशिम-शिरपूर या ९ किलोमीटर अंतराच्या रस्त्याला आता राज्यमार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. केंद्र आणि राज्य शासनाकडून या रस्त्याच्या अद्ययावतीकरणासाठी ९.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शिरपूर जैनला जिल्हा मुख्यालयाशी जोडणाऱ्या वाशिम-शिरपूर रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक खूप अडचणीची झाली आहे. चालकांना वाहन चालविताना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी सर्वच स्तरांतून करण्यात येत होती. आता या मार्गातील शिरपूर ते ब्राह्मणवाडा ९ किलोमीटर अंतराच्या मार्गाची दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या प्रयत्नाने सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, तर आमदार अमित झनक यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून ३.२५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अर्थसंकल्प तरतुदीमधील निधीतून होणाऱ्या कामाची निविदा प्रक्रिया अल्पावधीतच निघणार असल्याची माहिती मालेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता डी. सी. खारोळे यांनी दिली, तर केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून मार्गाचे रूंदीकरण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिमचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर यांनी सांगितले.
--------
आठवडाभरात तात्पुरती डागडुजी
शिरपूर-वाशिम मार्गाच्या दर्जोन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून ९.२५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असला तरी, त्या कामाला थोडा कालावधी लागणार असल्याने मार्गाची सध्याची स्थिती पाहता. या मार्गाची तात्पुरती डागडुजी केली जाणार आहे. हे काम येत्या आठवडाभरात सुरू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. यासाठी निधीही प्राप्त झाला आहे. दरम्यान, पूर्वी प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता असलेला हा मार्ग २०१३ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.