२०१२ पूर्वी गावात नादुरुस्त नळयोजनेमुळे पाणीटंचाई होती. गावकऱ्यांना विशेषतः महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य इमदाद बागवान यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४.८९ मंजूर करून घेतले. मात्र, या योजनेचे काम नियमानुसार करण्यात आले नाही. पाइपलाइन जमिनीमध्ये योग्य त्या खोलीवर टाकण्यात आली नाही. परिणामी पाइपलाइन वारंवार लिकेज होत आहे. बागवान यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांसह तक्रारीसुद्धा केल्या. अधिकाऱ्यांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले. यावर बागवान यांनी लोक न्यायालयात प्रकरण नेले; परंतु अपेक्षित न्याय मिळू शकला नाही. परिणामी शिरपूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन वारंवार नादुरुस्त होत आहे. मागील पंधरा दिवसांपासून गावातील पाणीपुरवठा बंद आहे. लिकेज झालेली पाइपलाइन दुरुस्ती करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
........
राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम हे नियमानुसार न झाल्याने पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन कुठे ना कुठे सतत नादुरुस्त होत आहे. यामुळे गावकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकत नाही. याला वरिष्ठ स्तरावरील अधिकारी जबाबदार आहेत.
- इमदाद बागवान,
माजी जिल्हा परिषद सदस्य,
शिरपूर जैन
शिरपूर ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन प्रकल्पानजीकच एका मोठ्या नाल्यात नादुरुस्त झाली आहे. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मोठे प्रयत्न करूनही पाइपलाइन दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. याविषयी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत.
- भागवत भुरकाडे,
ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत, शिरपूर