शिरपूर जैन : लघु पाटबंधारे विभागाच्या थकीत देयकाची रक्कम काही प्रमाणात भरल्याने अखेर शिरपूर येथील पाणीपुरवठा अकराव्या दिवशी सुरळीत झाला. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता नळधारकांनी पाण्याची नासाडी न करता काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन उपसरपंच अस्लम परसुवाले यांनी केले आहे.
शिरपूर ग्रामपंचायतकडे पाणीपुरवठ्याचे देयक थकल्याने लघु पाटबंधारे विभागाने अडोळ प्रकल्पातून होणाऱ्या शिरपूरच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा ‘महावितरण’कडून खंडित केला होता. त्यामुळे तब्बल दहा दिवस शिरपूरवासीयांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागला. येथील ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर ऑगस्ट २०२० ते १६ फेब्रुवारीदरम्यान ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे सोपविण्यात आला होता. ग्रामपंचायतीकडे पाटबंधारे विभागाचे पाणीपुरवठा योजनेचे देयक भरण्यासाठी निधीची तरतूद नव्हती. यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी करवसुलीच्या माध्यमातून प्रयत्नही केले; परंतु अपेक्षित प्रमाणात वसुली होऊ शकली नाही. त्यामुळे देयक भरणे ग्रामपंचायतीला शक्य झाले नव्हते. दरम्यान, १६ फेब्रुवारीला सरपंच सरपंचाची निवड करण्यात आली. त्यानंतर लगेच १७ फेब्रुवारीला ग्रामपंचायतीने पाटबंधारे विभागाच्या थकीत देयकाची काही रक्कम भरली. त्यामुळे अकराव्या दिवशी अर्थात १८ फेब्रुवारीला येथील पाणीपुरवठा सुरळीत झाला. आता ग्रामस्थांनी पाण्याची नासाडी टाळावी आणि पाणी कर तत्काळ भरावा, असे आवाहन ग्रामपंचायत उपसरपंच अस्लम परसुवाले यांनी केले आहे.