लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : ३ कोटी १७ लाखांचा निधी खर्चून येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत उभी झाली. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून या इमारतीत विद्यूत व्यवस्था उभारण्याचे काम निविदा प्रक्रियेस होत असलेल्या विलंबामुळे रखडल्याने ‘पीएचसी’चे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. परिणामी, शिरपूर परिसरातील ३३ गावच्या नागरिकांना आजही आरोग्यविषयक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. मालेगाव तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत, सर्वात मोठी ग्रामीण बाजारपेठ म्हणून शिरपूरची ओळख आहे. भारतभरातील जैन बांधवांची काशी म्हणूनही शिरपूरचा नावलौकीक आहे. असे असले तरी या गावात शासन स्तरावरून पुरविल्या जाणाºया आरोग्यविषयक सुविधांची वाणवा आहे. पुर्वी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीअभावी ३३ गावच्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असे. ही बाब लक्षात घेवून ‘पीएचसी’च्या नव्या इमारत उभारणीसाठी ३.१७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून एप्रिल २०१७ पासून इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. त्यातून सुसज्ज शस्त्रक्रिया गृह, स्वतंंत्र महिला व पुरूष वार्ड, औषधालय, निर्जंतूकीकरण वार्ड, प्रसुती कक्ष, नेत्र तपासणी कक्ष, ड्रेसिंग रूम, वैद्यकीय अधिकाºयांसाठी दोन कक्ष, औषधी भांडार, पार्किंग व्यवस्था, स्वयंपाक गृह यासह एकूण ३२ कक्षांची सुविधा उपलब्ध करण्यात आली. सद्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे; परंतु विद्युत सुविधा उभारण्याचे काम निविदा प्रक्रियेत अडकल्याने लोकार्पणाची प्रक्रियाही रखडली आहे. शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नविन इमारतीत विद्यूत सुविधा उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदार नेमून काम पूर्ण होईल. त्यानंतरच ‘पीएचसी’चे लोकार्पण शक्य आहे. - ए.व्ही. उगले अभियंता बांधकाम विभाग, पंचायत समिती, मालेगाव
शिरपूरच्या नव्या ‘पीएचसी’ला लोकार्पणाची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:30 PM