वाशिम : रिसोड तालुक्यातील मौजे वडजी येथील जवळपास ६५ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा समूह पद्धतीने इस्त्राईल तंत्रज्ञानाचे जोड देऊन गट शेतीची मुहूर्तमेढ रोवली आहे. इस्त्राईल तंत्रज्ञान आधारीत संत्रा बागेची शिवार फेरी कार्यक्रम व गट शेतीची सभा दिनांक ५ जुलै रोजी कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने प्रगतशील शेतकरी केशवराव श्रीरंगराव बोरकर यांच्या शेतात संपन्न झाली. कृषी संजीवनी सप्ताहाचा औचित्याने सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर शास्त्रज्ञ या उद्देशाने विशेष महत्व प्राप्त झाले.
गट शेतीच्या पहिल्या सभेला अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डाॅ. आर. एल. काळे यांची उपस्थिती लाभली तर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निवृती पाटील व एस. के. देशमुख उपस्थित होते. शेतकरी सभेच्या पूर्वी एकत्रितरीत्या शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांनी १६ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बागांना भेटी देऊन तंत्रज्ञान आत्मसात करताना आढळलेल्या चांगल्या बाबी व त्रुटी प्रत्यक्ष चर्चा व बागेतच निराकरण करण्यात आले.
गट शेतीच्या सभेत बोलताना डाॅ. काळे यांनी बदलत्या शेती पद्धती व्यवस्थेमध्ये शिक्षित व ज्ञानी युवा शेतकऱ्यांची गरज असल्याचे सांगून नियोजनाच्या आधारे अत्यंत चांगल्या प्रकारे अर्थार्जन कसे करता येईल उदाहरणातून मांडले. कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने या गटाला तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता सातत्याने तांत्रिक प्रशिक्षण, इतर शेतकऱ्यांच्या शेताला भेटी व विद्यापीठाच्या शिवारफेरी कार्यक्रमात सहभाग घेणार असल्याचा सूतवाचक केला.
तज्ज्ञ मार्गदर्शक निवृती पाटील यांनी भेटीमध्ये आढळलेल्या बाबींस अनुसरून तांत्रिक उपाययोजनामध्ये छाटणी, कोळशी रोग, नाग आळी इत्यादीचे व्यवस्थापन बाबत सुचविले तसेच खताचे नियोजन, जातीवंत कलमांचे महत्व व गोकृप्पा कल्चर बाबत विवेचन केले. व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन त्यांनी केले. तर एस.के. देशमुख यांनी गट शेतीचे फायदे व जोडीला सामाजिक माध्यमांचा वापर यामुळे विचारांची देवाणघेवाण व नियमित सतर्क राहणे शक्य होत आहे. गट शेतीला चालना देण्याकरिता कृषी विज्ञान केंद्र सदैव पुढाकार घेईल.
कार्यक्रम दरम्यान उत्कृष्ट बागेकरता महेंद्र धोंडबाराव बोरकर सभेचे यशस्वी नियोजन गोपाल बोरकर व राजू पंडितराव बोरकर यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृती पाटील तर आभार विलास बोरकर यांनी मानले.