Eknath Shinde vs Uddhav Thackeray Supporters | संतोष वानखडे, वाशिम: पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेना अशा दोन गटात शिवसैनिक विभागला जात आहे. जिल्ह्यातही हळूहळू दोन गट पडत असून, समर्थनार्थ मुंबई गाठली जात आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जिल्हा, उपजिल्हा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली होती. आता खासदार भावना गवळी यांचे समर्थकही मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनार्थ रविवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले. यामुळे आगामी काळात राजकारण तापण्याचा अंदाज राजकीय वर्तुळातून वर्तविला जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० आमदारांसह बंड पुकारत शिवसेनेला धक्का दिला होता. १९ जुलै रोजी नवी दिल्लीत १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला पाठिंबा दर्शविला. या १२ खासदारांमध्ये भावना गवळी यांचादेखील समावेश आहे. खासदार गवळी यांच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील शिवसेनेला खिंडार पडू नये म्हणून शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयासह जिल्हा प्रमुख, बहुतांश उपजिल्हाप्रमुख, आजी-माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद सदस्य, स्थानिक नेत्यांनी ‘अॅक्शन मोड’वर येत बैठकांचा सपाटा लावला होता. दुसरीकडे खासदार भावना गवळी यांच्या रिसोड, मालेगाव, वाशिम, मंगरूळपीर व मानोरा येथील समर्थकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनार्थ जिल्हा पिंजून काढला. काही ठिकाणावरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर शक्तीप्रदर्शनाचा आणि मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा एक भाग म्हणून खासदार गवळी समर्थकही खासगी वाहनाने रविवारी सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले.
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ मुंबईवारी
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईला जात आहेत. रविवारी रिसोड तालुक्यातून शेकडो शिवसैनिक ‘मातोश्री’कडे रवाना झाले तसेच ४०० पेक्षा अधिक प्रतिज्ञापत्र तयार करण्यात आले. रिसोड तालुक्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला.