लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाभरात बँकांसमोर "डफडे बजाओे" आंदोलन केले. राज्यशासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहिर केल्यानंतर, निकषात बसलेले किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले याबाबतची माहिती अद्याप निश्चित व परिपूर्ण झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्यापही आपले कर्ज माफ झाले की नाही, याची माहिती नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी, यासाठी संबंधित बँकांनी लाभार्थी यादी मागवून ही यादी सुचना फलकावर लावावी आणि त्या संबंधित बँकेकडून किती शेतकरी कर्जमुक्त झाले हे जाहिर करावे, या मागणीसाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बँकांसमोर डफडे बजाओ आंदोलन केले. वाशिम येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करण्यात आले. रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात जेथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे, तेथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.