- नंदकिशोर नारे वाशिम : प्रसृतीसाठी ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्णांवर थातूर-मातूर तपासणी करुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करण्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री घडली होती. परंतु या महिलेचे त्याच दिवशी वाशिम येथे जात असताना रस्त्यात रुग्णवाहिकेत नॉर्मल प्रसृती झाली. यावर रुग्णांच्या नातेवाईकाने दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचा केलेला आरोप व ईतर बाबीच्या सखोल चौकशी संदर्भात लोकमतने २ व ३ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्या वृत्ताची दखल जिल्हा शल्य चिकित्सक ए.व्ही. सोनटक्के यांनी घेवून संबधित अधिकाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावल्या.रिसोड ग्रामीण रुग्णालयात ३१ जुलै रोजी प्रसृतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची थातूर-मातूर तपासणी परिचारिकांकडून करुन त्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सही मारुन गंभीर रुग्ण म्हणून वाशिम रेफर करुन हात मोकळे केले. परंतु सदर रुग्ण गंभीर आहे तर त्याची रुग्णालयापासून १५ किलोमिटर अंतरावरील रुग्णवाहिकेतच नॉर्मल प्रसृती झाली , विशेष म्हणजे ज्यावेळी या रुग्णाला रेफर करण्यात आले त्यावेळी कर्तव्यावर असेलेले वैद्यकीय अधिकारी रुग्णालयातचं हजर नव्हते, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केल्याची माहिती मिळताच लोकमतने या संदर्भात सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल जिल्हा शल्य चिकित्सकांनी घेवून येथील वैद्यकीय अधिकारी चोपडे यांच्याशी चर्चा केली. व कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी धम्मपाल मोरे यांना याबाबत सविस्तर खुलासा मागितला. सदर प्रकार गंभीर असून दोषी आढळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर त्यांच्या खुलाश्यानंतर नक्की कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सोनटक्के यांनी दिली.
वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वेगवेगळया स्वाक्षऱ्यारिसोड ग्रामीण रुग्णालयात सदर घटनेच्या दिवशी अनुपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. धम्मपाल मोरे यांच्या रुग्णाला रेफर केलेल्या पत्रावर वेगळी तर हजेरी पत्रकावर वेगळी स्वाक्षरी दिसून येत आहे. याचाच अर्थ ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी हे अधिकारी हजर नव्हते. यांची स्वाक्षरी तेथे हजर असलेल्या परिचारिकेने केल्याचे निष्पन होत आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक चौकशी दरम्यान हे उघडकीस येणारचं यात शंका नाही.
एकेकाळी रिसोड तालुक्याचे नाव आघाडीवरएकेकाळी नॉर्मल प्रसृती करण्यात रिसोड तालुक्यात आघाडीवर होता. यानिमित्त मांगुळ झनक येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. जयप्रकाश बगडीया यांचा सत्कार सुध्दा करण्यात आला होता. परंतु दिवसेंदिवस कामचुकार अधिकाºयांमुळे याला रोख बसला आहे. मांगुळ झनक येथील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी जयप्रकाश बगडीया यांनी आपल्या कारकिर्दित सर्वात जास्त नॉर्मल प्रसृती रुग्णालयात केल्याची नोंद आहे. तर दुसरीकडे रिसोड ग्रामीण रुग्णालयात घडलेले प्रकार घडत आहेत.
सदर प्रकरणाची दखल घेण्यात आली असून या गंभीर प्रकाराबाबत संबधित अधिकाºयांना ‘शो-कॉज’ नोटीस बजावल्या आहेत. त्यांच्या उत्तरानंतर कारवाई केल्या जाईल. - ए.व्ही. सोनटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम