मानोरा: पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत असलेल्या तालुक्यातील शेंदुरजना अढाव ते रुईगोस्ता रस्त्याचे काम निधीअभावी रखडले आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जि. प. सदस्य सचिन पाटील रोकडे यांच्यासह तिघांनी गुरुवारी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाइल विरुगिरी आंदोलन केले. पंचायत समिती सदस्य रेखा पडवाह, महिला व नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे प्रशासन व पोलीस विभागाची तारांबळ उडाली. अखेर जिल्हा ठिकाणावरून वरिष्ठ अधिकार्यांनी आंदोलनकर्त्यांंशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून रस्ता काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यामुळे तब्बल ३ तासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मानोरा तालुक्यातील शेंदुरजना अढाव ते रुईगोस्ता रस्त्याचे काम एका वर्षापूर्वी पंतप्रधान सडक योजनेंतर्गत मंजूर झाले; परंतु निधी नसल्याने रस्त्याचे काम रखडले. याबाबत जि.प. सदस्य सचिन पाटील यांनी पाठपुरावा करून वेळोवेळी निवेदन दिलीत; मात्र संबंधितांनी काहीच कार्यवाही केली नाही. यामुळे विद्यार्थ्यांंसह नागरिकांची गैरसोय होत आहे. अखेर प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी पदाधिकारी व नागरिकांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. नागरिकांनी ठिय्या दिला. या आंदोलनात जि.प. सदस्य सचिन पाटील, परशराम ढंगारे, समाधान साबळे, पंकजपाल महाराज आदींनी भाग घेतला तर ठिय्या आंदोलनात पं. स. सदस्य रेखा पडवाळ, शारदा मनवर, विलास राठोड, रणवीर ब्राह्मण, सुभद्राबाई घोनी, बबलू शेख, हरिभाऊ पवार, सचिन गावंडे, नथ्थू पडवाळ, गजानन नाटकर, उत्तम पडवाळ, रायसिंग खचकड, उल्हास मनवर, दिलीप गावंडे, सोनपाल खचकड, आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.
रस्त्याच्या मागणीसाठी ‘शोले स्टाइल’ आंदोलन
By admin | Published: June 17, 2016 2:28 AM