ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 29 - सिंचन विहिरींच्या मंजुरीकरिता मालेगाव येथे शेतक-यांनी गुरूवारी ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले. त्याची दखल घेत प्रशासनाने तत्काळ विहिरींना मंजुरी दिली. मालेगाव तालुक्यातील ‘मग्रारोहयो’अंतर्गत २२२ विहिरींची प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आली होती. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले होते.
रद्द करण्यात आलेली मान्यता कायम ठेवून आम्हाला सिंचन विहिरींचा लाभ द्या, या मागणीकरिता शेतक-यांनी नागरदास रोडवरील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा शेतक-यांनी घेतला.
दरम्यान, पोलीस स्टेशनचे कर्मचारी, पंचायत समितीचे अधिका-यांनी घटनास्थळी दाखल होवून बैठक घेतली. तसेच वरिष्ठांशी चर्चा करून शेतक-यांच्या विहिरींना मंजुरी देण्यात आली. त्यावर समाधान झाल्याने शेतक-यांनी आपले आंदोलन मागे घेतले.