जिल्ह्यात गेल्या १३ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट बस्तान मांडून आहे. फेब्रुवारी २०२१नंतर आलेल्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. यासह कोरोनाचा मृत्युदरही कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने ९ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले. याअंतर्गत २० मेपर्यंत केवळ दवाखाने व मेडिकल्स सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली होती. त्यात अंशत: बदल करून २० मेनंतर फळे, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ यासह इतर अत्यावश्यक सेवा दररोज सकाळी ७ ते ११ या चार तासांच्या अवधीत पुरविण्यास परवानगी देण्यात आली; मात्र कपड्यांची दुकाने, मोबाइल विक्री व दुरुस्तीची दुकाने, हार्डवेअर यासह इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे प्रशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईसह वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत; मात्र त्याचे वाशिमच्या बाजारपेठेत सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
...................
बाॅक्स :
सततची टाळेबंदी; व्यापारी तरी काय करणार?
कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून गेल्या वर्षभरात अनेकवेळा लाॅकडाऊन, संचारबंदी, कडक निर्बंध आदींच्या नावाखाली सततची टाळेबंदी अवलंबिण्यात येत आहे. यामुळे मात्र व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्यासह दुकानांमध्ये ठेवलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार देणेही त्यांना अशक्य होत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर तोडगा म्हणून बाजारपेठेतील सर्वच व्यापाऱ्यांनी अघोषित एकी करून सकाळच्या सुमारास शटर बंद-चालू करत व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रकार अवलंबिल्याचे दिसत आहे.
...
बाॅक्स :
पोलिसांच्या वाहनाचे सायरन वाजताच ‘खबरदार’
वाशिमच्या मुख्य बाजारपेठेतील दुकाने नावालाच बंद राहत असून, व्यवसाय बऱ्यापैकी सुरूच आहे. शटर बंद-चालू करण्यासाठी दुकानांबाहेर नोकराची नेमणूक केलेली असते. यादरम्यान पोलिसांच्या वाहनाचे सायरन वाजताच सर्वजण ‘खबरदार’ होतात. वाहन पुढे जाताच पूर्वीप्रमाणे ग्राहक आत-बाहेर काढण्याचा कार्यक्रम सुरू होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
................
कोट :
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा जिवाचे रान करीत आहे. या संकटावर मात करण्यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधाचे प्रत्येकालाच किमान काही दिवस तरी पालन करावेच लागेल. जी दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश आहेत, ती दुकाने सुरू राहत असतील तर प्रशासनालाही नाइलाजास्तव धडक कारवाईची मोहीम हाती घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम