वाशिम : गत दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने सलून (केशकर्तनालय) व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सलून व्यावसायिकांसाठी एखादे पॅकेज जाहीर करावे, दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिक संघटनेने शनिवारी केली.
२०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेतही एप्रिल ते सप्टेंबर महिन्यापर्यंत सलूनची दुकाने बंदच होती. त्यामुळे व्यावसायिकांना विविध संकटांना सामोरे जावे लागले. त्यानंतर काही अटी व शर्तीवर सलूनची दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. दुसऱ्या लाटेत १४ एप्रिलपासून सलूनची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सलून व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाल्याने एप्रिल महिन्यापासून निर्बंध कठोर करण्यात आले. ९ मे ते ३१ मे या दरम्यान जिल्ह्यात निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाचा आलेख खाली येत असल्याचे पाहून अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य काही दुकानांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये सलूनच्या दुकानांचा समावेश नाही. गेल्यावर्षीदेखील दीर्घकाळ दुकाने बंद असल्याने सलून व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामधून सावरत नाही, तोच एप्रिल महिन्यापासून पुन्हा दुकाने बंद झाल्याने उत्पन्नाचे मार्गही आपसूकच बंद झाले. दुकान भाडे, विद्युत देयके आदींचा भरणा कसा करावा? असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. या सर्व बाबींचा विचार करून सलून व्यावसायिकांसाठी पॅकेज जाहीर करावे, दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी सलून व्यावसायिकांनी केली.
०००
काय आहेत मागण्या?
दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने वीजबिल माफ करण्यात यावे, दुकानाचे भाडे म्हणून किमान दहा हजार रुपये देण्यात यावे, विमा संरक्षण देण्यात यावे, दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात यावी आदी मागण्या सलून व्यावसायिक संघटनेने केल्या.
००
कोट बॉक्स
दोन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने दुकानाचे भाडे, वीज देयकाचा भरणा कसा करावा? असा प्रश्न आहे. सलून दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी तसेच आर्थिक हातभार म्हणून शासनाने एखादे पॅकेज जाहीर करावे.
- पवन कणखर
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र सलून व पार्लर संघटना, वाशिम