वाशिम : मिशन बिगेन अंतर्गत जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये आणखी शिथिलता देवून यापूर्वी परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना सेवा सुरु ठेवण्यास २ तासांचा कालावधी वाढवून देत ही वेळ ९ वाजेपर्यंत करण्यात आली. तसेच स्थानिक आठवडी बाजार, गुरांचे बाजार कंटेंन्मेंट झोनच्या बाहेर भरविण्यास परवानगी देण्यात आली.अनलॉक ५ च्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता मिळाली असून, यापूर्वी परवानगी दिलेली दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी वाचनालय सुरू करण्यास मुभा देण्यात आली. तसेच बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून याबाबतच्या आवश्यक सूचना उद्योग विभागामार्फत निर्गमित केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ व राज्य कौशल्य विकास मिशन अंतर्गत नोंदणीकृत अल्प कालावधीची प्रशिक्षणे घेण्याची परवानगी देण्यात आली. शाळा, महाविद्यालये, सर्व शैक्षणिक संस्था व कोचिंग क्लासेस ३१ आॅक्टोबर २०२० पर्यंत बंद राहतील. मात्र, आॅनलाईन शिकवणी पद्धतीस परवानगी राहील. ५० टक्के टीचिंग व नॉन टीचिंग स्टाफला आॅनलाईन शिकवणी व इतर अनुषंगिक कामासाठी शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्थामध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी कंटेंन्मेंट झोनच्या बाहेरील शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्थांसाठी लागू राहील. तसेच आरोग्य व स्वच्छता विषयी आवश्यक खबरदारी घेणे बंधनकारक राहील. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना शालेय शिक्षण विभाग निर्गमित करणार आहे.
वाशिम जिल्ह्यात दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 4:51 PM