लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘मिशन बिगीन अगेन’अंतर्गत अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. ‘अनलॉक-४’ची अंमलबजावणी २ सप्टेंबरपासून सुरू झाली असून, त्यानुसार जिल्ह्यात परवानगी दिलेली सर्व दुकाने, आस्थापना, सेवा आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा मिळाली आहे. दवाखाने, मेडिकल स्टोअर्स २४ तास सुरु राहतील. मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून हॉटेल, लॉज पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास तसेच खासगी प्रवाशी वाहतुकीस परवानगी राहील, असे जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी स्पष्ट केले.‘अनलॉक-४’ च्या टप्प्यातील नवीन नियमावलीनुसार खुल्या जागेत शारीरिक कसरत, व्यायाम करण्यास मुभा राहणार आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवाशी व माल वाहतुकीला आता कोणत्याही परवानगीची अथवा ई पासची आवश्यकता असणार नाही. दुचाकीवरून दोन व्यक्तींना प्रवासाची मुभा राहील. मात्र हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक आहे. तीन चाकी वाहनांमध्ये चालक व दोन व्यक्तींना, तर चारचाकी वाहनांमध्ये चालक व ३ व्यक्तींना प्रवास करण्यास मुभा राहील. नगरपरिषद क्षेत्रातील पेट्रोलपंप सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु तर हायवे वरील पेट्रोलपंप २४ तास सुरु राहू शकणार आहेत. लग्न समारंभ कार्यक्रमासाठी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाच्या अधीन राहून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील. अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० व्यक्तींना मुभा राहणार आहे.नाका-तोंडावर मास्क, रुमाल, गमछा इत्यादीचा वापर बंधनकारक राहील. याचा वापर न केल्यास ५०० रुपये दंड तसेच सार्वजनिक ठिकाणी अथवा कार्यालयीन कामाच्या ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिबंधित क्षेत्रात नवीन आदेश पारित करण्यास मनाईराज्य शासनाच्या १९ मे २०२० आणि २१ मे २०२० चे आदेश आणि त्यामध्ये राज्य व केंद्र शासनाने केलेल्या सुधारणानुसार निश्चित केलेल्या निकषानुसार यापुढेही प्रतिबंधित क्षेत्र अस्तित्वात राहतील. कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशात बदल करून किंवा नवीन आदेश पारित करून या आदेशाच्या विसंगत असा कोणताही आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पारित करता येणार. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६०, भारतीय दंड संहीता १८६० चे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मोडक यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.