गत आठवड्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. शेजारच्या अकोला, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, जिल्ह्यातही गत दोन दिवसांत १९१ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २० फेब्रुवारी रोजी आदेश पारीत करून रात्री ८ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू केली. यामधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आले आहे. मेडिकल्स्, डेअरी, महामार्गावरील पेट्रोल पंप व ढाबे तसेच एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग वगळता जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली. रात्री ८ वाजल्यानंतर दुकाने सुरू ठेवल्यास नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
बॉक्स..
रात्रीच्या संचारबंदीतून याला मिळाली सूट!
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. संचारबंदीमधून शासकीय व खासगी रुग्णवाहिका सेवा, रात्रीच्या वेळेस सुरू राहणारी औषधांची दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वे, बस किंवा खासगी प्रवासी वाहनाने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता ऑटो, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग, महामार्गावरील पेट्रोल पंप व ढाबे.
बॉक्स
आठवडी बाजारही बंदच
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी शनिवारी दिला. पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार, गुरांचे बाजार बंद राहणार आहेत.