मानोरा (जि. वाशिम): नापिकी आणि दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर दिवाळी सण साजरा करण्यासाठी व्यापार्यांना कवडीमोल भावाने कापूस विकण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित अधिकार्यांनी मानोरा येथे सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्यांकडून सोमवारी करण्यात आली. यंदा अल्प पावसामुळे खरिपातील उत्पादनात प्रचंड घट आली. त्यामुळे शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. आता दीपावलीचा सण तोंडावर आल्याने घरात आलेल्या कपाशीतून थोड्या कपाशीची विक्री करून सण साजरा करण्याच्या मन:स्थितीत शेतकरी असताना, व्यापारी अतिशय कमी भावाने त्यांच्याकडून कपाशी खरेदी करीत आहेत. सद्यस्थितीत मानोर्यात कपाशीला केवळ ३८00 ते ४000 रुपये प्रतिक्विंटलचा भाव व्यापार्यांकडून दिला जात आहे. प्रत्यक्षात शेतकर्यांकडे जे पीक उत्पादन आता उरले नाही, त्या जवळपास सर्वच शेतमालाचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे आता शेतकर्यांकडे जो शेतमाल मोठय़ा प्रमाणात आहे, त्यापैकी कपाशीला मात्र अत्यंत कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
शेतक-यांकडून कपाशीची अल्पदरात विक्री
By admin | Published: November 11, 2015 1:47 AM