शेतकऱ्यांना नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. कधी दुष्काळी, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचं नुकसान होऊन शेतकऱ्यांना अतोनात आर्थिक हानी सहन करावी लागते. अशा स्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा योजना आधार ठरू शकते. त्यामुळे गत काही वर्षांपासून शेतकरी सातत्याने पीक विमा योजनेत सहभागी होत आहेत. त्यासाठी हजारो रुपयांचा भरणाही ते करतात, परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे प्रत्यक्ष नुकसान होऊन आणि शेतकऱ्यांनी रीतसर तक्रार करूनही पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचे प्रमाण कमी असते. अनेक शेतकऱ्यांना तर केवळ ४ ते १० रुपये पीक विमा नुकसानापोटी मंजूर केल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. यामुळेच शेतकरी पीक विमा योजनेत सहभाग नाेंदविण्यास उदासीन असून, आता या योजनेत सहभाग घेण्यासाठी अवघे चार दिवस उरले असतानाही भर जहाँगीर परिसरातील ४० टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही.
--------------------
कोट : नैसर्गिक आपत्तीपासून पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी सावकाराचे कर्ज काढून पीक विम्याची रक्कम आम्ही भरतो. त्यासाठी वारंवार सावकाराचे उंबरठे झिजवतो, परंतु नैसर्गिक आपत्तीने पिकाचे नुकसान होऊनही प्रत्यक्ष विमा भरपाई मिळत नाही. त्यामुळे या योजनेत सहभागी होण्यासाठी अकारण खर्च का करावा आणि कंपनीला मोठे होण्यास मदत का करावी, असा प्रश्न पडतो. त्यामुळेच यंदा आम्ही पीक विमा काढलेला नाही.
-भानुदास गीते,
शेतकरी, भर जहाँगीर