लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक अथवा सांघीक खेळांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या क्रीडा शिक्षकांमार्फत ठराविक ‘सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शालेय स्तरावरील खेळाडूंसाठी साधारणत: ५० क्रीडा प्रकार असून १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडू त्यासाठी पात्र ठरविले जातात; परंतु खेळांमध्ये सहभाग घेण्यापूर्वी नियमानुसार त्या-त्या खेळांसाठी आकारले जाणारे ठराविक शुल्क भरून आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. गतवर्षीपर्यंत ही प्रक्रिया आॅफलाईन स्वरूपात राबविली जायची. यंदापासून मात्र सर्व शाळांना यू-डाईस क्रमांक, यूजर आय-डी, पासवर्ड देवून शालेय खेळाडूंची आॅनलाईन नोंदणी करण्याच्या सूचना क्रीडा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र शाळांकडे या कामासाठी पुरेसा फंड नसणे, अनेक शिक्षकांना संगणकीय पुरेसे ज्ञान नसणे, संगणकांना लागणारी वीज, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी समस्यांमुळे क्रीडा शिक्षकांकडून खेळाडूंच्या आॅनलाईन नोंदणीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विविध स्वरूपातील ५० क्रीडा प्रकारांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना खेळण्याची संधी दिली जाते. त्यासाठी गतवर्षीपर्यंत कागदोपत्री नोंदणीची सोय होती, ती यंदापासून ‘आॅनलाईन’ झाली आहे. त्यास शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसला तरी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी साधारणत: एक ते दीड लाख रुपये सेवा शुल्क निश्चितपणे वाढले आहे. - प्रदिप शेटिये, जिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम
खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांकडून अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 4:47 PM