लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात रेमडेसिविरसोबतच ‘मेरोपेन्नम’ इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचे समोर येत आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून या इंजेक्शनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना औषधीसाठी धावपळ करावी लागत आहे. प्रामुख्याने रेमडेसिविर इंजेक्शनसाठीच ही धावाधाव असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा चार हजारांपेक्षा अधिक असून रुग्णांना बेडसाठी आणि त्यानंतर औषधीसाठी नातेवाइकांना धावाधाव करीत लागते. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह फॅबीपिरॅवीर टॅब्लेट अन्य आवश्यक औषधी जिल्ह्यात तूर्तास तरी बऱ्यापैकी उपलब्ध आहे. त्यामुळे फारसे चिंतेचे कारण नाही. कोरोनासंदर्भाने आवश्यक असलेल्या औषधीचे जिल्ह्यात घाऊक विक्रेते ७ आहेत, तर किरकोळ विक्रेत्यांची संख्या २५ च्या घरात आहे. या सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या औषधी साठ्याची दररोज माहिती घेण्यात येते. त्यामुळे गरजेनुरूप जिल्ह्यात आवश्यक औषधी उपलब्ध होत असल्याचे एका घाऊक औषधी विक्रेत्याने सांगितले. मात्र, मेरोपेन्नम इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने रुग्ण व नातेवाइकांची थोडी चिंताही वाढत आहे.
दुसरीकडे शासकीय रुग्णालयांमध्ये औषधींचा साठा भरपूर असल्याचेही जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूत्रांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांवरील उपचाराच्या दृष्टीने फॅबीपिरॅवीर टॅब्लेट, हायड्रोकार्ब्ड, मिथील प्रेडनी सोलेन, लोमॉलीक्युलर वेट हेपॅरीनसह अन्य औषधांचा साठा उपलब्ध आहे. अन्य आजारांसंदर्भातील औषधीसाठाही मागणीच्या तुलनेत बऱ्यापैकी उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. जिल्ह्याची रेमडेसिविर इंजेक्शनची दररोजची गरज खासगी आणि शासकीय रुग्णालय मिळून जवळपास ३५० च्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या तुलनेत जिल्ह्याला दररोज १५० ते २०० च्या आसपास रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी रेमडेसिविरची अडचण नसली तरी खासगी रुग्णालयात त्याची अडचण असून त्यासाठी रुग्णांची धावपळ होत आहे. त्यातच पहिला डोस हा दोन इंजेक्शनचा असल्याने त्याची जमवाजमव करताना रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
कोट बॉक्स
जिल्ह्यात मेरोपेन्नम इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याबरोबरच काही प्रमाणात हेपॅरीन, मिथील प्रेडनी सोलेन या औषधाची तुटवडा जाणवतो. मागणीच्या तुलनेत औषधी उपलब्ध झाली तर उपचार करणे अधिक सुलभ होते.
- डॉ. सचिन पवार
खासगी कोविड हॉस्पिटल, वाशिम