शिरपूर येथे जवळपास सात हजार नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. पहिला डोस घेऊन दोन महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी लोटला आहे. दुसरा डोस घेण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिक शिरपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात चकरा मारत आहे. लस मिळावी म्हणून सकाळी लवकरच नागरिक आरोग्यवर्धिनी केंद्रात हजेरी लावत आहे. वेळप्रसंगी रखरखत्या उन्हात रांगेत उभे राहत आहेत. आठवडाभरात केवळ ३५० लसीचे डोस शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्राला पुरविण्यात आले. त्यापैकी १८ ते ४४ वर्षे वयोगटातील १०० नागरिकांना लस देण्यात आली, तर दोनशे नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या डोससाठी शिरपूर येथील नागरिकांसाठी पर्याप्त प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुसऱ्या डोससाठी पात्र लाभार्थींची संख्या लक्षात घेऊन लसींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
०००००००
बॉक्स....
नागरिकांनीही नियम पाळणे गरजेचे
शिरपूर येथे हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे कोरोना चाचणी व लसीकरणाला गती देण्याची गरज आहे. सोबतच शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करणेसुद्धा गरजेचे आहेल, अन्यथा भरगच्च लोकवस्ती असलेल्या शिरपूर येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्यास फारसा वेळ लागणार नाही. पोलिसांच्या वतीने मास्क न वापरणाऱ्यावर व दुचाकीधारकांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. असे असले तरी लस घेण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. या गर्दीतून कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांनीही नियम पाळणे गरजेचे आहे.