वाशिम : प्राथमिक आरोग्य केंद्रांत औषधीसाठा उपलब्ध नसणे, बोगस डॉक्टरांचा सूळसुळाट, पशू वैद्यकीय दवाखान्यांतील औषधी आदींवरून मंगळवारच्या (दि.१२) जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली.
स्व.वसंतराव नाईक सभागृहात मंगळवारी दुपारी २ वाजता सुरु झालेल्या स्थायी समिती सभेचे पिठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे होते. यावेळी उपाध्यक्ष चक्रधर गोटे, सभापती सर्वश्री सुरेश मापारी, अशोक डोंगरदिवे, वैभव सरनाईक, वैशाली प्रमोद लळे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत सपकाळे यांची मंचावर उपस्थिती होती.
प्राथमिक आरोग्य केंद्रांत पुरेसा औषधीसाठा नसल्याचा मुद्दा जि.प. सदस्य दिलीप देशमुख यांनी मांडला. यावर औषधी साठा संपल्यानंतर ऐनवेळी मागणी नोंदविणाऱ्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश सीईओ वसुमना पंत यांनी दिले. बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा मुद्दा जि.प. सदस्य आर.के. राठोड यांनी उपस्थित केला. यावर तक्रारी आल्यास सापळा रचून बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याचे निर्देश उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी दिले.