लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गत दोन दिवसांपासून जिल्हाभरात रिमझिम स्वरूपात संततधार पाऊस सुरू असून यामुळे पाण्याअभावी तसेच किडींचा प्रादुर्भाव होऊन संकटात सापडलेल्या खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे; मात्र मध्यंतरी पावसाची प्रदिर्घ उघडिप आणि आता सुरू असलेला पाऊस दमदार स्वरूपात नसल्याने धरणांच्या पाणी पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही. वाशिमला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ ४१ टक्के जलसाठा झाला आहे.वाशिम जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली जाते. यंदा मात्र पावसाला विलंब झाल्याने पेरण्याही विलंबाने सुरू झाल्या. परिणामी, सोयाबिनचा अपवाद वगळता उडिद, मुग या कडधान्य पिकांसह अन्य पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळेच नियोजित ४ लाख ७ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ९४ हजार ३१० हेक्टर क्षेत्रावर यावर्षी खरीपातील पिकांची प्रत्यक्ष पेरणी झाली. त्यात एकट्या सोयाबिनचे क्षेत्र तब्बल २ लाख ८८ हजार २४६ हेक्टर आहे.दरम्यान, आधी विलंब आणि मध्यंतरी पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या सोयाबिनचे पीक धोक्यात सापडले होते. पाण्याचा अभाव आणि अधूनमधून निर्माण होणाºया ढगाळी वातावरणामुळे या पिकावर हिरवी उंटअळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.अशात गत दोन दिवसांपासून रिमझिम तथा सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस होत असल्याने पिके धुऊन निघाली असून किडींचा प्रादुर्भाव बºयापैकी घटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रिमझिम पावसामुळे खरीपातील पिकांना संजीवनी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 2:23 PM