लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जिल्हास्तरीय लोकार्पण सोहळा येथे ‘डिजिटल लॉन्चिंग’ पध्दतीने ५ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून होणार आहे. वाशिममध्ये आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्हयाचे सह पालकमंत्री मदन येरावार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे, राज्य शिक्षण सल्लागार परिषदेचे उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे, जि.प. अध्यक्ष हर्षदा देशमुख, खासदार भावना गवळी, आमदार गोपिकिशन बाजोरिया, लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रातील असंघटीत कामगारास ३ हजार रुपये इतकी किमान निश्चित पेंशन देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्हयात अलिकडेच नाव नोंदणी झालेल्या असंघटीत कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते यावेळी कार्ड वाटप करण्यात येणार आहे. तसेच इच्छुकांनी या योजनेत नाव नोंदणी करण्याची संधी लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमस्थळी उपलब्ध असणार आहे. त्यासाठी केवळ आधारकार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक सोबत आणावे. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कामगारांच्या आजच्या वयानुसार किमान ५५ रुपये ते कमाल २०० रुपये एवढा पहिला हप्ता भरुन योजनेत समाविष्ट होता येईल. जिल्हयातील असंघटीत कामगारांनी या सोहळयास मोठया संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक कुमार मीना यांनी केले आहे.
श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी होणार लोकार्पण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 5:31 PM