वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. यंदा मागणी वाढली असली तरी शेंगदाणा, साबुदाण्याच्या किमती मात्र स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.
श्रावण महिन्यात श्रद्धेपोटी मोठ्या संख्येने भाविक उपवास ठेवतात. ऐन सणासुदीच्या काळात महागाई डोके वर काढते. उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढताच, किमतीचा भडका उडतो. यंदा सर्वच पदार्थांच्या किमतींत वाढ झाली. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वीच शेंगदाणा, साबुदाणा, भगर आदींच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे श्रावण महिन्यात या पदार्थांच्या किमतीत आणखी वाढ झाली नसल्याचे किराणा व्यावसायिकांनी सांगितले. उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाणा, शेंगदाणा, भगर, आदी पदार्थांना मागणी वाढली आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी साबुदाणा प्रतिकिलो ५५ रुपये, तर शेंगदाणा प्रतिकिलो १०५ रुपये असे दर होते. तिसरा श्रावण सोमवार उलटल्यानंतरही या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.
००००००००००००००००
असे आहेत दर (प्रतिकिलो)
श्रावणाआधीचे दर आताचे दर
साबुदाणा ५५ ५५
शेंगदाणा १०५ १०५
००००००००००००००००
मागणी वाढली, किमती स्थिर
साबुदाणा
उपवासाच्या पदार्थांत साबुदाणाला विशेष महत्त्व आहे. साबुदाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणमूल्य अतिशय कमी आहे. साबुदाण्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असतात; तर अतिशय अल्प प्रमाणात प्रथिने असतात. असे असले तरी उपवासात आताही साबुदाण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.
००००
शेंगदाणा
उपवासाच्या पदार्थात शेंगदाण्याचादेखील वापर केला जातो. शेंगदाण्यालादेखील मागणी आहे. मागणी वाढल्याने काही प्रमाणात आवक जरी घटली असली तरी किमतीत मात्र काही फरक पडला नाही. श्रावणाआधी असलेले दर आताही तेच कायम आहेत. मात्र भाविकांना दिलासा मिळत आहे.
००००००००००००
भगरीचे दरही स्थिर
श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांत भगरीलादेखील पसंती असते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी भगरीचे दर प्रतिकिलो १०५ रुपये असे होते. श्रावण महिन्याला सुरुवात होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तथापि, भगरीचे दर वाढले नाहीत. मागणी वाढलेली असतानाही श्रावणात भगरीचे दर प्रतिकिलो १०५ असेच आहेत.
००००००००००००००
मागणी वाढली
कोट
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढते. श्रावणात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ होते. यंदा श्रावणाआधी आणि आता असलेल्या उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ झाली नसल्याचे दिसून येते. शेंगदाणा, साबुदाणा, भगरीचे दर जैसे थे आहेत.
- निशांत राठी, किराणा व्यापारी