मंगरुळपीर तालुक्यातील पिंपळखुटा संगम येथे दरवर्षी श्रीराम नवमीला संत भायजी महाराज यांच्या भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. या यात्रा महोत्सवासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती असते. मात्र, यावर्षी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून १४ एप्रिल ते २७ एप्रिल २०२१ दरम्यान साजरा होणारा १३० वा यात्रा महोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा न करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे बुधवार १४ ते बुधवार २१ एप्रिल दरम्यान फक्त दोन जणांनीच
आळीपाळीने ‘राम कृष्ण विठ्ठल हरी नारायण’ नामाचा अखंड जयघोष केला. रामनवमीच्या दिवशी बुधवार २१ एप्रिल रोजी सकाळी चार वाजता काकड आरती, सकाळी नऊ वाजता मूर्ती व समाधी पूजन, सकाळी ११ वाजल्यापासून ह.भ.प. प्रकाश महाराज यांच्या वाणीतून श्रीराम जन्म कथा प्रवचन, दुपारी दोन वाजता श्रीराम, लक्ष्मण व सीता मूर्ती पुजन व दुपारी तीन वाजता गोविंद महाराज प्रदक्षिणा व दहीहांडी व दुपारी चार वाजता सर्व देव देवतांना नैवेद्य दाखविण्यात आला. पिंपळखुटा संगम येथील गुढीपाडवा ते हनुमान जयंती दरम्यानच्या यात्रा महोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. येथील राम नवमीचा महाप्रसाद पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने जवळपास ९० हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यावर्षीच्या कार्यक्रमाला भाविकांनी येऊ नये व रामजन्मोत्सव घरीच साजरा करावा असे आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आले होते. भाविकांनी आवाहनला प्रतिसाद देत मंदिर परिसरात गर्दी न करता श्रीराम जन्मोत्सव घरीच साजरा केला.