कामरगाव परिसरातून जवळपास ८ किलोमीटर अंतरात कापसी नदी वाहते. कधीकाळी या नदीमुळे परिसरातील भूजल पातळीला मोठा आधार होत असे, तसेच शेतक-यांना सिंचनासाठीही पाणी मिळत होते. कालांतराने या नदीचे पात्र रोडावत गेले. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह कमी होऊन नदी कोरडी पडू लागली. प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर चार वर्षांपूर्वी या नदीचे खोलीकरण करण्यात आले. त्यासाठी मुख्यमंत्री निधीतून १ कोटी रुपये खर्च करण्यासह भारतीय जैन संघटनेकडून जेसीबी आणि पोकलेन मशीनही पुरविण्यात आल्या. खोलीकरणानंतर पुढील वर्षांत या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. परिणामी भूजल पातळीला आधार झाला आणि शेतक-यांनाही सिंचनासाठी पाणी मिळू लागले; परंतु त्यानंतर या नदीच्या पात्राची आवश्यक देखभालच करण्यात आली नाही. त्यातच नदीचे खोलीकरण केल्यानंतर निघालेली माती आणि मुरुमाचे ढिगारे काठावरच सोडण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसांत ही माती, मुरूम पाण्यामुळे वाहून पुन्हा नदीपात्रात आल्याने पात्र बुजत गेले, तर झुडपेही वाढली. त्यामुळे आता नदीपात्रात पाणीच थांबेनासे झाल्याने शेतक-यांना याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही.
-------------
बंधारे झाले जमीनदोस्त
चार वर्षांपूर्वी भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून आणि मुख्यमंत्री निधीतील १ कोटी रुपयांच्या खर्चातून कापसी नदीचे खोलीकरण करतानाच पात्रात पाणी अडविण्यासाठी बंधारेही बांधण्यात आले होते. त्यामुळे शेतक-यांना सिंचनासाठी आधार झालाच शिवाय भूजल पातळी टिकून राहण्यासही मोठी मदत झाली होती; परंतु वर्ष दीड वर्षातच या नदीमधील बंधारे जमीनदोस्त झाले. त्यामुळे नदीपात्रातील पाणी न थांबता वाहून जात आहे.